मुंबई : घोषित केल्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला.मेट्रो सिनेमा परिसरातून निघालेल्या या मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर कठोर टीका करताना, देश काय ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे?अशी गर्जना केली तर एसआयआर रद्द करा आणि ईव्हिएम ऐवजी बॅलेट पबेपरवर मतदान घेण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान या मोर्चाच्या मार्गावर जिकडे नजर जाईल तिकडे आंदोलकांची गर्दी पाहायला मिळाली.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या मोर्चासाठी एकत्र आले. मोर्चाच्या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाला महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे नेते मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या आंदोलनाला व्यापक राजकीय पाठिंबा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मोर्चाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, हातात झेंडे, घोषणाबाजी आणि ठाकरे बंधूंच्या समर्थनार्थ दिल्या जाणार्या घोषणा यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र उद्धवसेनेचे युवा नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची या मोर्चातील अनुपस्थितीत चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमापासून सुरू झालेला हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत आला. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रूपांतर झाले.
एसआयआर बेकायदेशीर, राज ठाकरे कडाडले !!
या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देशभरात मतचोरीमुळे वातावरण तापलंय. मी २०१७ पासून सांगतोय, की मतचोरी सुरु आहे. त्यादरम्यान, मी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. मी सतत सांगत होतो. मतांमध्ये चोरी होत आहे. त्यावेळी मी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असं म्हणत होतो, असं राज ठाकरे म्हणाले. मत अशी कमी होऊ शकत नाही. या ठिकाणी सर्व बसलेले नेते देखील त्यावेळी होते, असं राज ठाकरेंनी सांगितले. २०२४ ची निवडणूक संपूर्ण बहुमत, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही. लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. संपूर्ण सन्नाटा होता, मग हा कोणता विजय? ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत १ कोटी मत वाढली. तुमची इतकी मत वाढली आता सगळ्या गोष्टी उघड झाल्या.
आपण या देशाचा ढाचा बदलत आहोत- राज ठाकरे
एकाच उद्योगपतींना जंगलं, प्रकल्प, बंदरे दिले जात आहेत. सरकारचा मनमानी कारभार सुरु आहे. निवडणूक आयोग जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही कसे ही निवडून येऊ...या देशाची आर्थिक स्थिती बरबाद करू...अमेरिकेला सरेंडर होऊ..तुम्हाला रांगेत उभे करू...पेट्रोल इंधनाचे भाव वाढवू...कोणतीही भीती यांना दिसत नाही आहे. काँग्रेसच्या काळात ही अनेक उद्योगपती होते. पण यांच्या काळात एकच उद्योगपती..अशी टीका राज ठाकरेंनी केली. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग सगळे ताब्यात घ्यायचे. आपण या देशाचा ढाचा बदलत आहोत. या सगळ्याच्या विरोधात हा मोर्चा आहे, असं राज ठाकरेंनी ठणकावले.
माझ्या फक्त २ मागण्या...दूध का दूध आणि पानी का पानी होईल !
देशातील एसआयआर बेकायदेशीर आहे. माझ्या फक्त दोनच मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच दुसरी मागणी म्हणजे यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, दिल्लीत जाऊन बोला. उद्या कोणाची सत्ता येऊ दे... काही फरक पडत नाही. पण सत्ता योग्य मार्गाने आली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
देश काय ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे? उद्धव ठाकरेंची गर्जना
जे इथले स्थानिक पातळीवर वैध अवैध पातळीवर ठरवण्याचा अधिकार दिल्लीत आहे. बीएलओ वगैरे जाणार. ते ज्ञानेश कुमार ठरवणार? देश काय ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणाने केली आहे. ज्ञानेश कुमार उद्या निवृत्त झाले तरीही त्यांच्या वर कोणतीही कारवाई होणार नाही. ही कोणती लोकशाही आहे. जर पंतप्रधानांना तसं संरक्षण नसेल, तर ज्ञानेश कुमारांना का आहे. चोरी केलीस तरी काही नाही पोलीस आपलंच आहे. नेमणूक पक्षपातीपणने, शिवाय संरक्षणही आहे. हा मनमानीपणा सहन केला जाणार नाही.